"मिड-डे" दैनिकाचे स्तंभलेखक अनिष त्रिवेदी यांना ऍट्रोसिटी कायद्यान्वये ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा.

मुंबई दि. २ फेब्रुवारी (प्रतिनिधी) दु.00:00

"सरकारी मालकीची जी आस्थापने आहेत, ती खाजगी क्षेत्राच्या तुलनेत दारिद्र्यात खितपत पडली आहेत. कारण सरकारी कंपन्यात आरक्षणाद्वारे आलेली जी बारीकसारीक लेंडके आहेत, त्यांना पक्की खात्री आहे की आपण कसेही काम केले तरी आपल्याला कोणी काढू शकणार नाही, ना आपलं कोणी काही वाकडं करू शकेल......" अशा प्रकारे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या दलित मागासवर्गीय समाजाच्या विरोधात अतिशय हीन, गलिच्छ व अपमानास्पद लेखन मुंबईतील मिड-डे या इंग्रजी वर्तमानापत्रात, त्या दैनिकाचे स्तंभलेखक
अनिष त्रिवेदी यांनी दिनांक ३० एप्रिल २००६ रोजी केले होते.
त्या विरोधात मुंबईतील फुले-आंबेडकरी, विद्रोही व पुरोगामी चळवळीतील जागरूक कार्य कर्त्यांनी दिनांक १ मे २००६ रोजी मिड-डे दैनिकाच्या कार्यालयाबाहेर उग्र निदर्शने करून निषेध नोंदवला. त्यानंतर सदर आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुरेश भोसले, सुबोध मोरे, सुमेध जाधव, ज्ञानेश्वर निळे, मिलिंद भवार, अशोक पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाणे येथे या दैनिकाचा स्तंभलेख अनिष त्रिवेदी, दैनिकाच्या संपादीका लाजवंती डीसोजा व दैनिकाचे मालक कृष्णा वारीयर या तिघांच्या विरोधात दलित मागासवर्गीयांचा अवमान केल्याच्या कारणास्तव अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ [ऍट्रोसिटी ऍक्ट] अन्वये फिर्याद दाखल केली, आणि सदर तक्रारीचा सतत पाठपुरावा केला. त्यानंतर वरील खटल्यात फिर्यादी म्हणून सुरेश भोसले, सुमेध जाधव ,सुबोध मोरे यांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आणि दिनांक २७ जानेवारी रोजी सदर खटल्यात न्यायमूर्ती श्रीमती चित्रा किरण बेदी यांनी या खटल्यातील प्रमुख आरोपी स्तंभलेखक श्री. अनिष त्रिवेदी यांना अनुसुचित जाती-जमाती प्रतिबधक कायदा १९७९ अंतर्गत अवमानजनक
लेखन केल्याबद्दल दोषी ठरवून शिक्षा होण्याची संपूर्ण भारतात ही पहीलीच वेळ असल्यामूळे प्रसार माध्यमाच्या इतिहासात या निकालाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. किमान या निकाला मुळे प्रसार माध्यमातील जातीयवादी-मनुवादी प्रवृत्तीला थोडा आळा बसेल असे वाटते.
या खटल्यातील फिर्यादी म्हणून आमचे असे मत आहे की, प्रमुख आरोपीस न्यायालयाने दिलेली ६ महीने तुरूंगवासाची शिक्षा ही त्याने केलेल्या गुन्ह्यापेक्षा खुपच कमी आहे. आरोपीच्या लेखनाचा समाजात विद्वेष पसरविण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याला सदर कायद्यातील तरतूदीनुसार किमान ५ वर्षे शिक्षा होणे आवश्यक होते. तसेच संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सदर खटल्याच्या तपासामध्ये काही तांत्रिक दोष ठेवल्यामुळे दैनिकाचे मालक व संपादक यांची मुक्तता झाली आहे. ज्या आधिकाऱ्यांनी तपासात त्रुटी ठेवल्या त्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही शासनाने अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ च्या कलम ४ अन्वये कारवाई करावी आणि आरोपीला कायद्याप्रमाणे अधिक शिक्षा करावी व अन्य आरोपींवर ही कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात शासनाने अपिल करावे अशी मागणी फिर्यादीतर्फे सुरेश जाधव, सुमेध जाधव, सुबोध मोरे यांनी केली आहे.

प्रबुध्द साहित्य संमेलनातून जनता सुबुध्द होईल - आनंदराव पाटील

पुणे दि. २ फेब्रुवारी (प्रतिनिधी) दु.00:00

प्रबुध्द साहित्य संमेलन वारंवार व्हावीत यासाठी आपण शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू असे अभिवचन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी दिले.प्रबुध्द साहित्य परिषदेच्या वतीने सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या ९८ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय

प्रबुध्द कवी संमेलनाचे उद्घाटन आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले. पुण्यातील अब्दुल कलाम आझाद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ प्रबुध्द कवी बादशहा सय्यद हे होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.भगवान ठाकूर, कवी म.भा.चव्हाण हे उपस्थित होते.
प्रथम रामजी बाबांच्या प्रतिमेस आनंदराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. यावेळी झालेल्या प्रबुध्द कवी संमेलनात भीमशाहीर हिरापुत्र भवार, प्रा. प्रकाश दळवी, बाळ आल्हाट, गोरख भालेराव, मारूती सोनावणे, समक्य शिंदे, संभाजी शिंदे आदी मान्यवर कवींनी कविता सादर केल्या. यावेळी प्रबुध्द प्रकाशनाच्या वतीने आनंदराव पाटील यांना ’प्रबुध्द जलसे’ व ’ब्राह्मणी गुलामीची प्रतिके हे ग्रंथ कीर्तीपाल गायकवाड व भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते भेट देण्यात झाले. यावेळी विजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उठाव मुंबई निर्मित ’एल्गार निळ्या पाखरांचा’ हा विद्रोही कवितांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. यामध्ये प्रा. विवेक मोरे, आकाश सोनावणे, बबन सरोदे, डॉ. गोविंद लोखंडे यांनी सहभागी होऊन कवि संमेलन गाजविले. या समारंभास कार्याध्यक्ष क्षितिज राजे गायकवाड, ऍड. अशोक जाधव, युवा नेते अभिजीत कदम यांच्यामुळे संमेलन यशस्वी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाघमारे यांनी केले. संमेलनास प्रा. रतनलाल सोनग्रा, यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विजयराव जगताप यांनी आभार व्यक्त केले.